
अकोट
ता . प्रतिनिधी
रामेश्वर कावरे उमरा
उमरा : येथील उप प्राथमिक आरोग्य केंद्रात महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात व आदरपूर्वक साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्याची आठवण ठेवत समाजसेवेचा संदेश दिला.
या कार्यक्रमात CHO (समुदाय आरोग्य अधिकारी) मोहम्मद जाहिद सर, आरोग्य सेवक ओळंबे सर, आरोग्य सेविका किरण ढोणे तसेच आशा कार्यकर्त्या छाया धोंडेकर, आशा तायडे, वर्षा मावळकर व सुनिता चिंचोळकर उपस्थित होत्या. सर्वांनी एकत्र येत जयंती साजरी करून सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले.
यावेळी महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यात आला. शिक्षणाचा प्रसार, स्त्री शिक्षणाची चळवळ, अस्पृश्यतेविरुद्ध लढा आणि शेतकरी व वंचित घटकांच्या हक्कासाठी त्यांनी केलेले कार्य याबाबत माहिती देण्यात आली. त्यांच्या विचारांनी समाजात समानता, बंधुता आणि न्याय यांचे बीज रुजवले असल्याचे वक्त्यांनी नमूद केले.
आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी सांगितले की, महात्मा फुले यांचे विचार आजही तितकेच महत्त्वाचे आहेत. विशेषतः ग्रामीण भागात आरोग्य सेवा देताना समाजातील सर्व घटकांपर्यंत समानतेने सेवा पोहोचवण्याची प्रेरणा त्यांच्या कार्यातून मिळते. यामुळेच आरोग्य सेवा अधिक प्रभावी आणि लोकाभिमुख होऊ शकते.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी महात्मा फुले यांच्या विचारांचे अनुकरण करून समाजाच्या प्रगतीसाठी आणि जनसेवेसाठी कार्य करण्याचा संकल्प केला. अशा उपक्रमांमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ होत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.