
विदर्भ एक्सप्रेस न्युज अकोट तालुका प्रतीनिधी
रामेश्वर कावरे उमरा
उमरा (ता. अकोट) – उमरा गावातील ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपून बराच कालावधी उलटला असतानाही , ना प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यामुळे गावातील विकासकामे ठप्प झाली असून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपल्यानंतर गावात कोणतेही ठोस निर्णय घेतले जात नसल्याने अनेक महत्त्वाची कामे रखडली आहेत. रस्ते दुरुस्ती, पाणीपुरवठा योजना, स्वच्छता मोहीम तसेच इतर मूलभूत सुविधा यांवर गंभीर परिणाम झाला आहे.
गावातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग साचले आहेत, ज्यामुळे आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे.
गावातील विकासकामांसाठी ठोस नेतृत्व नसल्यामुळे शासकीय योजनांचा लाभही योग्य पद्धतीने मिळत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांकडून एकच प्रश्न उपस्थित केला जात आहे – “प्रशासक येणार तरी कधी?”
लवकरात लवकर प्रशासकाची नियुक्ती करून गावातील प्रलंबित कामे मार्गी लावावीत किंवा ग्रामपंचायत निवडणुका जाहीर कराव्यात, अशी जोरदार मागणी उमरा ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. प्रशासनाने या गंभीर परिस्थितीकडे तात्काळ लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.