
उमरा प्रतीनिधी:-
रामेश्वर कावरे उमरा
उमरा :ता. अकोट परिसरात पशुवैद्यकीय दवाखान्याची अवस्था अत्यंत चिंताजनक झाली असून, शेतकरी व पशुपालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतीसोबतच पशुपालन हा येथील प्रमुख व्यवसाय असतानाही शासकीय पशुवैद्यकीय सेवा अपुरी पडत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, उमरा येथील पशुवैद्यकीय दवाखाना अनेकदा बंदच असतो. कायमस्वरूपी डॉक्टरांची नियुक्ती नसल्याने किंवा नियुक्त डॉक्टर वारंवार अनुपस्थित राहत असल्याने जनावरांच्या उपचारासाठी पशुपालकांना खाजगी डॉक्टरांचा आधार घ्यावा लागत आहे. यामुळे आर्थिक भार वाढत असून, गरीब शेतकऱ्यांची मोठी अडचण होत आहे.
वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे काही ठिकाणी जनावरांच्या मृत्यूच्या घटना घडल्याचीही माहिती समोर येत आहे. तसेच दवाखान्याची इमारत असूनही त्याची देखभाल अत्यंत निकृष्ट अवस्थेत आहे. आवश्यक औषधे, उपकरणे व सुविधा नसल्याने हा दवाखाना केवळ नावालाच उरल्याचे चित्र दिसून येते.
या संदर्भात पशुपालकांनी संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून उमरा येथील पशुवैद्यकीय सेवा सुरळीत कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
मागणी
उमरा येथे कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी नेमावा, दवाखाना नियमित सुरू ठेवावा व आवश्यक औषधांचा पुरवठा तात्काळ करावा, अशी मागणी पशुपालकांकडून करण्यात येत आहे.