
तेल्हारा प्रतिनिधी :-
संत श्री वासुदेवजी महाराज यांचा संस्काराचा वसा आणि वारसा समर्थपणे सांभाळी गत ३८ वर्षापासून बालसंस्कार शिबिराच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यी व विद्यार्थिनींना सुसंस्कारीत करण्याचे महान कार्य अगदी नेटाने व समर्थपणे करणारे भागवताचार्य श्री. ज्ञानेश्वर महाराज वाघ यांना श्री भागवत समिती तथा श्री महादेव संस्थान उरळ बु ll यांच्या संयुक्त विद्यमान श्रीराम नवमीच्या पर्वकाळावर श्रीयुत गोपाळ महाराज उरळकर यांच्या शुभहस्ते हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत विदर्भ रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी श्रीयुत गोपाळ महाराज उरळकर यांनी श्री वाघ महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाचा लेखाजोखा उपस्थितांच्या समोर मांडत असतांना सांगितले की, महाराज हे संत श्री वासुदेव महाराजांच्या शिष्य परंपरेत एक अनमोल रत्न असून, आपल्या परखड शैलीतून व निष्ठा पूर्ण कार्यातून त्यांचा वारसा तेच समर्थपणे चालवत आहेत व चालवीत राहतील. म्हणून त्यांच्या कार्याचा गौरव या ठिकाणी करण्यात आला.
सत्काराला उत्तर देत असतांना वाघ महाराज म्हणाले की , वास्तविक पाहता हा सन्मान माझा नसून, वारकरी संप्रदायातील सेवेचा पर्यायाने सेवाधाऱ्याचा गुणगौरव आहे.