
!
तेल्हारा ता. प्रतिनिधी नंदकिशोर नागपुरे
तेल्हारा तालुक्यातील सौंदळा येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ग्राम सौंदळा येथील जागृत मरीमाय संस्थान परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्र पौर्णिमेनिमित्त भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा यात्रा महोत्सव २ आणि ३ एप्रिल रोजी साजरा होणार असून, प्रशासकीय आणि ग्रामपंचायत तसेच संस्थान पातळीवर जय्यत तयारी सुरू आहे.
धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
या यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे भाविकांनी श्रद्धेने केलेले नवस फेडणे. दोन दिवसीय महोत्सवात खालील धार्मिक विधी पार पडणार आहेत:
काट्यावरचे लोटांगण: अत्यंत खडतर मानले जाणारे काट्यावरचे लोटांगण अनेक भाविक श्रद्धेने घेतात.
नाळे टोचणे व गाडे ओढणे: परंपरेनुसार नाळे टोचून घेणे आणि गाडे ओढण्याचे चित्तथरारक विधी पार पडतील यात्रेच्या पहिल्या दिवशी शेगडी मिरवणूक *पोथ मिरवणूक संपूर्ण गावातून काढली जाते.
गाव मिरवणूक: मातेची भव्य गाव मिरवणूक काढण्यात येणार असून, संपूर्ण परिसरात भक्तीमय वातावरण राहणार आहे.
महाप्रसाद: यात्रेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 3 एप्रिलला गावकरी व संस्थानच्या वतीने भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.
प्रशासन आणि ग्रामस्थांचे सहकार्य
यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी हिवरखेड पोलिसांसह अकोला जिल्ह्यातील अतिरिक्त पोलीस ताफा तैनात करण्यात येणार आहे. तसेच सौंदळा ग्रामपंचायत, पोलीस पाटील, तंटामुक्ती समिती, आरोग्य विभाग आणि महावितरणचे कर्मचारी चोवीस तास सेवा देण्यासाठी सज्ज आहेत.
“मरीमाय आजही भक्तांच्या हाकेला धावून जाते आणि संकटाचे निवारण करते, अशी भाविकांची गाढ श्रद्धा आहे. त्यामुळेच या यात्रेला संपूर्ण विदर्भ,महाराष्ट्र,मध्यप्रदेश,छत्तीसगड व गुजरात सह इतरही राज्यातून मोठ्या संख्येने भाविक हजेरी लावतात.”
ग्राम सौंदळा येथील मरी माय संस्थान सर्व ग्रामस्थ आणि यात्रा कमिटीच्या वतीने सर्व भाविकांना या उत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.