
विलास बेलाडकर :-
तेल्हारा : मराठी नववर्षाच्या शुभमुहूर्तावर लोकजागर महिला मंच, अकोट–तेल्हारा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “माझी गुढी” स्पर्धेला यंदा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. परंपरेचा सन्मान आणि सांस्कृतिक जतनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात तेल्हारा, अकोट तालुक्यातील विविध गांवातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
दरवर्षी विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवणाऱ्या लोकजागर मंचतर्फे यंदाही गुढीपाडव्याच्या निमित्ताने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक पद्धतीने उभारलेल्या, आकर्षक व पर्यावरणपूरक सजावटीच्या गुढींनी स्पर्धेचे स्वरूप अधिक रंगतदार केले.
या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे खापरखेड येथील जिल्हा परिषद शाळेचा सहभाग ठरला. विद्यार्थ्यांमध्ये शाळेबद्दलची आवड निर्माण व्हावी तसेच त्यांना अक्षरांची ओळख व्हावी या उद्देशाने शाळेत आकर्षक सजावटीसह गुढी उभारण्यात आली होती. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
स्पर्धेनिमित्त आयोजकांनी खापरखेड येथील शाळेला भेट देऊन सजवलेल्या गुढीची पाहणी केली. लोकजागर मंचचे संस्थापक अनिल गावंडे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत शुभेच्छा दिल्या.
यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती नयना सरोदे, ग्रामपंचायत खापरखेडचे उपसरपंच निलेश खोटरे, नितिन सावरकर,सौ. शारदा कुटाळे, श्रीमती अलका आमले, सौ. सत्यभामा बेलाडकर, सौ. ज्योती आमले, दुर्गा कुटाळे, सौ. मालु ताथोड, सौ. जिजा बेलाडकर यांच्यासह चि. समर्थ चितोडे, आनंदी चितोडे, प्रज्वल गवई, युवराज वानखडे तसेच स्वरा व विराज पोहनकर हे विद्यार्थी उपस्थित होते.
महिलांच्या सक्रिय सहभागातून आपल्या परंपरा अधिक बळकट होत असल्याचे या स्पर्धेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून, अशा उपक्रमांमुळे सांस्कृतिक जतनाला चालना मिळत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.