
तेल्हारा प्रतिनिधी :- सागर खराटे
पाथर्डी आ. प्रकाशजी भारसाकळे यांच्या उपस्थितीत प्रतिमापूजन | तहसीलदार महेश रामगुंडे यांचे नागरिकांना मार्गदर्शन
महाराष्ट्र शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ टप्पा क्रमांक १ अंतर्गत पाथर्डी येथे महसूल व विविध शासकीय सेवांचा लाभ देणारे शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिराची सुरुवात दिनांक 7/03/2029 रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. हे पूजन आमदार प्रकाशजी भारसाकळे आणि तहसीलदार महेश रामगुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
पाथर्डी येथील निळकंठ सपकाळ विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाला तेल्हारा तहसीलदार महेश रामगुंडे, बीडीओ अशोक बांगर, तहसील कार्यालयातील कर्मचारी, पंचायत समिती कर्मचारी, कृषी विभाग, आरोग्य विभाग, भूमी अभिलेख विभाग, अंगणवाडी सेविका, बीएलओ, तसेच पाथर्डी येथील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबिराचा लाभ पाथर्डी मंडळातील जवळपास १३ गावांतील नागरिकांनी घेतला. शिबिरामध्ये विविध दाखले वितरण, फेरफार प्रकरणे, घरकुल प्रमाणपत्र, आरोग्य विभागामार्फत गोल्डन कार्ड, तसेच पुरवठा विभागाकडून रेशन कार्ड वाटप करण्यात आले. त्यामुळे नागरिकांना विविध शासकीय सेवा थेट गावपातळीवर उपलब्ध झाल्या.
सकाळी १० वाजल्यापासून सुरू झालेले हे शिबिर सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालले. या दरम्यान नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देत त्यांचा लाभ कसा घ्यावा याबाबत तहसीलदार महेश रामगुंडे यांनी मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र शासनाच्या या उपक्रमाला पाथर्डी व परिसरातील गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, शिबिरामुळे अनेक नागरिकांची प्रलंबित कामे मार्गी लागली.