
अनंता मते:-अंजनगाव सुर्जी तालुका प्रतिनिधी
नाल्याकाठावरील शेतातील पाणी पिल्यानंतर बकऱ्या मृत; अंदाजे ५ लाखांचे नुकसान – पोलिस व पशुवैद्यकीय पथक घटनास्थळी
अंजनगाव सुर्जी (प्रतिनिधी) – तालुक्यातील मासमपूर पांढरी येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली असून नाल्याकाठी शेजारील शेतातील पाणी पिल्यानंतर तब्बल ५१ बकऱ्यांचा अचानक मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे संबंधित महिलांचे अंदाजे पाच लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गावातील काही महिला आपल्या बकऱ्या चरण्यासाठी नाल्याकाठी घेऊन गेल्या होत्या. बकऱ्यांना पाणी पाजण्यासाठी त्यांनी शेतकरी श्रीकांत रुचके यांच्याकडे विचारणा केली. नाल्याकाठावरील शेतातील पाणी पाजल्यानंतर काही वेळातच बकऱ्या अचानक अशक्त पडू लागल्या आणि एकामागून एक मृत झाल्या, अशी माहिती महिलांनी दिली.
या घटनेत शमशाद बी मोहम्मद रियाज, शहनाज बी वाईद खा, जयबून बी सालीमुद्दीन, हुस्ना बी शेख हमीद, शमा बी इस्राईल खा, शबाना बी सलमान खा, शकिला बी सय्यद रियाजुद्दीन आणि सलामा बी शेख इरफान यांच्या बकऱ्यांचा मृत्यू झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
या सर्व महिला मासूम बचत गटाशी संबंधित असून त्यांनी बचत गटातील पैसे काढून बकरीपालनाचा व्यवसाय सुरू केला होता. मात्र अचानक घडलेल्या या घटनेमुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. बकऱ्यांच्या मृत्यूमुळे अंदाजे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याने आता कर्जफेड कशी करावी आणि पुढील उदरनिर्वाह कसा चालवावा, असा गंभीर प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला आहे. नुकसान भरपाई कोण देणार, असा टाहो या महिलांनी फोडला असून शासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे