
अंजनगाव सुर्जी तालुका (प्रतिनिधी) – अनंता मते
स्वच्छतेचे महानायक संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त अंजनगाव सुर्जी येथे लोकजागर परिवारातर्फे शहानूर नदी पात्रात भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले. “एक हात मदतीचा – स्वच्छ व सुंदर शहरासाठी” या घोषवाक्याखाली नदी परिसरातील घनकचरा, प्लास्टिक पिशव्या, काट्याकुट्या व गवत काढून परिसर स्वच्छ करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांकडून स्वच्छतेवर आधारित प्रभावी नाटिका सादर करण्यात आली. नाटिकेद्वारे स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि नागरिकांची जबाबदारी याबाबत संदेश देण्यात आला.
यावेळी “पाणी आडवा, पाणी जिरवा” हा संदेश देत पर्यावरण संवर्धनाची शपथही घेण्यात आली.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अविनाश गायगोले होते. प्रमुख अतिथी म्हणून अमरावती लोकसभेचे खासदार बळवंत वानखडे उपस्थित होते. तसेच उपजिल्हाधिकारी (राष्ट्रीय रोजगार हमी योजना) ज्ञानेश्वर घ्यार, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे, तहसीलदार पुष्पा सोळंके, नायब तहसीलदार रवींद्र काळे, आरोग्य निरीक्षक वानखडे, उपनगराध्यक्षा प्रियंका मालठाणे, मुख्याधिकारी विजय लोहकरे, डॉ. विकास कविटकर, प्रदीप देशमुख, प्रवीण पेटकर,उपमुख्यधिकारी त्रिपुरारी , प्रशासकीय अधिकारी सुनील उमक,यांच्यासह नगरपरिषदेचे सभापती, नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
स्व. दिगंबरा पेटकर आदिवासी आश्रम शाळा, सीताबाई संगई नगरपरिषद शाळा तसेच इतर शाळांच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. “गावाची स्वच्छता ही माझी प्रथम जबाबदारी आहे,” असा संदेश विद्यार्थ्यांनी दिला.
विकासासाठी कटिबद्धता
उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार यांनी शासन स्तरावरून रस्ते व स्वच्छता अभियानासाठी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले. खासदार बळवंत वानखडे यांनी दर्यापूर मतदारसंघाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगून डीपीसी बैठकीत विकासकामांना गती देण्यात येईल, असे स्पष्ट केले.
भिंतींवर स्वच्छतेची रंगीत जनजागृती
या उपक्रमात सुरेंद्र वानखडे यांनी नदीपात्रातील भिंतीवर स्वच्छतेसंदर्भातील आकर्षक पेंटिंग साकारून जनजागृती केली. तसेच संत गाडगे महाराजांची “दशसूत्री” सुंदर अक्षरांत लिहून दर्शनी भागात रेखाटण्यात आली. या सर्जनशील उपक्रमामुळे परिसर अधिक आकर्षक झाला असून नागरिकांकडून सुरेंद्र वानखडे यांचे विशेष कौतुक होत आहे.
आयोजन व समारोप
या स्वच्छता अभियानाचे आयोजन आनंद संगई, बंडू हंतोडकर, संजय धारस्कर, देवानंद महल्ले, शिंदी जांभेकर तसेच लोकजागर परिवार, पतंजली परिवार, प्रजापती ब्रह्मकुमारी, बहुजन ओबीसी संघटना व इतर सेवाभावी संस्थांच्या वतीने करण्यात आले.
कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. संत गाडगेबाबांच्या जयंतीनिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे अंजनगाव सुर्जी शहरात स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण झाली असून नागरिकांनी अशा उपक्रमांचे सातत्य राखण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.