
अकोट प्रतिनिधी :संतोष विणके:आकोट
समाजातील रूढी, परंपरा आणि अंधश्रद्धांना छेद देत सामाजिक समतेचा संदेश देणारे कार्य सप्तखंजेरीवादक राष्ट्रीय किर्तनकार सत्यपाल महाराज यांनी पुन्हा एकदा समाजासमोर आदर्श ठेवला आहे. आपला पुतण्या पियुषपाल गजानन चिंचोळकर याचा नोंदणी पद्धतीने विवाह करून त्यांनी साधेपणा, कायदेशीरता आणि सामाजिक जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित करत समाजासमोर पुन्हा आदर्श ठेवला आहे. अकोला येथील विवाह नोंदणी कार्यालयात हा विवाह सोहळा पार पडला
सध्या विवाह सोहळ्यांवर होणारा अनावश्यक खर्च, दिखाऊपणा आणि स्पर्धा यावर आळा बसावा, तसेच युवकांनी कायदेशीर व साध्या पद्धतीने विवाह करावा, या उद्देशाने महाराजांनी हा निर्णय घेतला. नोंदणी विवाहामुळे वेळ, पैसा आणि ऊर्जा वाचते, तसेच समाजात सकारात्मक संदेश जातो, असे त्यांनी यावेळी सांगितले.विविहपश्चात सिरसोली येथिल गुरुवंदन आश्रम येथे कौंटुबिक कार्यक्रमात महाराजांनी विधवा महिलांना साडी-चोळीची भेट देत त्यांचा सन्मान केला. समाजात अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या विधवा महिलांना आत्मसन्मानाने जगता यावे, त्यांना आधार आणि प्रेम मिळावे, हा या उपक्रमामागील हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या सामाजिक उपक्रमाचे परिसरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि तरुणांनी स्वागत केले असून सत्यपाल महाराजांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या या कृतीमुळे समाजात समानता,साधेपणा आणि मानवी मूल्यांचा संदेश अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.