
तेल्हारा ता.(प्रतिनिधी): नंदकिशोर नागपुरे
तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथील सिद्धार्थ नगरस्थित ‘नालंदा बुद्ध विहारा’च्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने २९ एप्रिल २०२६ रोजी सुवर्ण महोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
दिवसभराचे कार्यक्रम
सुवर्ण महोत्सवाचा शुभारंभ सकाळी ६:०० वाजता मंगलमैत्री धम्मरॅली’ने करण्यात आला. त्यानंतर सकाळी ८:०० वाजता धम्मध्वजा रोहण आणि सामूहिक बुद्धवंदना पार पडली. सकाळी ९:०० वाजता भिक्खू संघाच्या उपस्थितीत धम्मदेसना देण्यात आली.

मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन
सकाळी १०:०० वाजता भव्य आरोग्य व रोगनिदान शिबिराचे उद्घाटन प्राथमिक आरोग्य केंद्र, दानापूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आशया शबीह अब्दुल हमीद यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. सपनाताई धम्मपाल वाकोडे होत्या. या शिबिरात सुमारे ३०० रुग्णांची मोफत तपासणी करून औषधोपचार करण्यात आले.
शिबिरासाठी उपस्थित मान्यवर व तज्ज्ञ डॉक्टर:
या कार्यक्रमाला अनेक मान्यवर आणि तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती लाभली होती:
प्रमुख अतिथी: मनोज ओहेकर (माजी डेप्युटी कमिशनर), सुमेध धनबहादूर (तांत्रिक अधिकारी, अकोला), विनोद विरघट (राज्य कर अधिकारी), किशोर तेलगोटे.
तज्ज्ञ डॉक्टरांची फळी: डॉ. सृष्टी लोणीकर (नेत्ररोग), डॉ. अभिजित सिरसाठ (अस्थिरोग), डॉ. निखिल कळासरे (हृदयरोग), डॉ. सत्यम वांडे, डॉ. अंकित तायडे, डॉ. निशांत वाकोडे (बालरोग), डॉ. आकाश चौधरी, डॉ. प्रफुल्ल वानखडे आणि डॉ. सदाफळे.
दांनापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी व आशा सेविकांचे विशेष सहकार्य या शिबिराला लाभले.
प्रबोधनपर व्याख्यान आणि सप्तखंजेरी कीर्तन
सायंकाळी ७:०० वाजता प्रख्यात प्रबोधनकार सप्तखंजेरी वादक रामपाल महाराज धारकर यांचे कीर्तन संपन्न झाले. आपल्या प्रबोधनातून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, महात्मा जोतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत तुकाराम महाराज, बिरसा मुंडा, अहिल्याबाई होळकर आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. थोर महापुरुषांचे विचार अंगीकारून राष्ट्रहित व समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
यशस्वी आयोजनासाठी परिश्रम
हा ऐतिहासिक सोहळा यशस्वी करण्यासाठी सिद्धार्थ तरुण मंडळ, त्यागमुर्ती माता रमाई उपासिका संघ, संघर्ष अभ्यासिका आणि सिद्धार्थ नगर व भीमनगर येथील समस्त दानापूरवासीयांनी मोलाचे योगदान दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाल विरघट यांनी केले, तर प्रास्ताविक व आभार गिरधर विरघट यांनी मानले. राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली.