
.
श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ.
द्वापारांती वसुदेव देवीच्या उदरी मथुरेत प्रगट होऊन ; गोकुळामध्ये नंद यशोदे कडे बाललीला करीत असतांनाच दैत्यखाणी बुडवून कंसशाही पालथी घालत साधूंचा मान प्रस्थापित करून , धर्म व नीतीची सांगड घालणारे भगवान श्रीकृष्ण हे देवकोटीतील प्रथम जगद्गुरु होत. तसेच केरळ प्रांतात अवतिर्ण होऊन संपूर्ण भारत भ्रमण करून देशावर शस्त्राद्वारे होत असणारे आक्रमण परतविण्यासाठी आखाड्यांच्याद्वारे नागा साधूंची सेना तसेच शास्त्रीय आक्रमणांना तोंड देण्यासाठी देशाच्या चहू दिशेला पिठांची स्थापना करून प्रस्थानत्रयी सारखी ग्रंथसंपदा निर्माण करणारे श्रीमद् आद्य शंकराचार्य हे शास्त्रकोटीतील द्वितीय जगद्गुरु असून ; वेदोपनिषदादी संस्कृत प्रचूर ग्रंथांचे तत्त्वज्ञान स्वतः पचवून त्यांना लोक सुलभ प्राकृत भाषेत प्रस्तुत करणारे वैदिक परंपरेतील जगद्गुरु त्रयांपैकी संत कोटीतील जगद्गुरु वारकरी संत श्री तुकाराम महाराज हे होत असे निष्ठा पूर्ण मत भागवताचार्य श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ यांनी मांडले.
ते आज संत श्री वासुदेवजी महाराज स्मृती मंदिर श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ येथे जगद्गुरु तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गमन सप्ताहाच्या सांगते निमित्ताने बीजोत्सवाचे प्रवचन प्रसंगी बोलत होते. ते पुढे म्हणाले की , साधकांना प्रपत्ती ( आत्मशरणांगती ) व संसारिकांना स्वकृतीतून प्रतिकार शिकविणारे व स्वतःचा प्रभाव झाकून स्वभाव प्रगट करणारे संत तुकाराम महाराज होते. जगत् कल्याणाचा विचार अद्ययावत सुविधा नियुक्त वातानुकूलित बंगल्यात नाही तर; जंगलातच जन्माला येतो म्हणून स्वतःचे घरदार सोडून श्रीक्षेत्र भंडारा , भामचंद्र , घोराळेश्वर डोंगरावर जात भाकरी मात्र स्वतःच्या घरची खाऊन विश्वोद्धाराकरिता भगवद्भजन करणारे , दुष्काळाच्या कालखंडामध्ये शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करणारे जगाच्या पाठीवरील पहिले आणि शेवटचे सरकार नव्हे सावकार अर्थातच जे आज रोजी सरकारला शक्य नाही ते ज्यांनी त्या काळात एकट्याने करून दाखवले.एवढेच नाही तर भगवान श्री ज्ञानोबारायांचे समाधी मंदिर स्वखर्चाने बांधणारे श्रीमंत संत जगद्गुरु तुकाराम महाराज हे होते. प्रपंच रचनेचा भोगून त्याग केल्यानंतर शांती व मुक्ती रुपी पतिव्रतेने ज्यांना स्वच्छेनी वरले असे परमार्थासह पुरुषार्थ करणे भगवान पंढरीशांचे कर्तूम् ,अकर्तूम् व अन्यथाकर्तूम् शक्तीने युक्त गाढे विर तुकाराम महाराज होते. पाखाड्यांचे खंडन करीत ; भगवंताने स्थापित केलेल्या धर्माचे पाळण करण्याकरिता अहोरात्र धडपडत असतांना कुणाचीही भिड भार न ठेवता तीक्ष्ण उत्तरांचे बाण आपल्या हातात घेऊन साना थोरांना उपदेशामृताची डोस देऊन आपल्या स्पष्ट वक्तेपणासाठी प्रसिद्ध , तसेच वेद , शास्त्र व ईश्वरनिष्ठ असणारे नास्तिक नसलेले पुरोगामी संत तुकाराम महाराजच होते.
वर्ण , आश्रम व लिंगभेदाला स्थान न देता आबाल वृद्धांना त्यांच्या अधिकारानुरूप उपदेश करणारी व गाणाऱ्याला तारणारी अखिल मानवमात्रांची गायत्री व आजीवन आचारसंहिता असणारी गाथा प्रदान करणारे , समाजाची व्यथा भगवद् दरबारी मांडून भगवदादेश समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचविणारे भगवदावतारी संत सुद्धा तुकाराम महाराज होते.
आपली कर्मभूमी असणाऱ्या मावळ प्रांतातील तरुण मावळ्यांना आपल्या प्रभावी प्रबोधनाच्या माध्यमातून मार्गदर्शन करून त्यांचे मन , मेंदू व मनगटे मजबूत करून त्याच माळकऱ्यांना धारकरी बनवीत देश , धर्म व संस्कृती रक्षणासाठी प्रथम संघटित करून संघर्षाकरिता सक्रिय करणारे व स्वराज्याच्या सेनेमध्ये सहभागी करवीणारे सर्वोत्कृष्ट संघटक, छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठविलेला नजराना परत पाठविणारे त्यांचे आध्यात्मिक गुरु तुकाराम महाराज होते. संपूर्ण जगत अज्ञानांधकारामध्ये बुडत असतांना संतग्रह मेळ्यामध्ये वारकरी संप्रदायाच्या प्राचीवर ( पूर्व दिशा ) उदयाला आलेले दैदिप्यमान तापरहित चिद् भानू , सदेह वैकुंठ गमनाच्या माध्यमातून भागवत धर्माची पताका वैकुंठात फडकविणारे वैकुंठ विजयी तसेच संप्रदायरुपी इमारतीचे झडझडीत सुवर्ण कळस जगद्गुरु तुकाराम महाराज होत. केवळ अवतारोत्तरच नाही तर ; अवतार पूर्व असणाऱ्या भगवानश्री ज्ञानेशादिक संतानाही प्राणप्रिय असणारे थोर संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचे अलौकिक जीवन संत श्री वासुदेवजी महाराजांनी वेदोपनिषदादी ग्रंथ तथा राज्यपत्रातील अनेकानेक दाखले देऊ संशोधनात्मक पद्धतीने लिहिलेल्या ३७ अध्यायाचे श्री संत तुकाराम महाराज संपूर्ण चरित्राचा दाखला देत उपस्थितांना पटवून व ते चरित्र स्वतः वाचण्याचा सल्ला दिल्याचे श्री ज्ञानेश्वर महाराज भालतिलक हे कळवितात.